गांडूळ खात निर्मिती प्रकल्प
बचत गटाने उभारला गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प
Gandul khat nirmiti prakalp
बचत गटामध्ये सुजाता कावणकर (अध्यक्ष), अनिता कावणकर (सचिव), रंजना कावणकर (खजीनदार), सुलभा रामाणे, सविता कोळंबे, विजया कोळंबे, आश्विनी पानगले, तारामती पानगले, राधिका घाणेकर, वंदना कावणकर या महिला कार्यरत आहेत.
पंचायत समितीने घेतलेल्या प्रशिक्षणामध्ये महिलांना गांडूळ खत निर्मितीबाबत (Vermicompost Production) माहिती मिळाली. या गटातील महिलांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, तसेच काही खासगी स्तरावरील गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पांना भेटी देऊन गांडूळ खत निर्मितीमधील तंत्रज्ञान समजून घेतले. Gandul khat nirmiti prakalp
गटातील महिलांनी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांच्या सल्ल्याने ३१ डिसेंबर २००५ रोजी गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पाला सुरुवात केली. यास पंचायत समितीची चांगली साथ मिळाली.
प्रकल्पाबाबत रंजना कावणकर म्हणाल्या, की आम्ही खतनिर्मितीसाठी चार शेड उभारल्या आहेत. त्यामध्ये १३ फूट बाय ३ फूट बाय ३ फूट आकाराच्या टाक्या बांधल्या आहेत. सध्या ३६ टाक्यांमध्ये गांडूळ खताची निर्मिती केली जाते.
गांडूळ खत निर्मितीसाठी ८० टक्के शेण आणि २० टक्के पालापाचोळ्याचा वापर करतो. गांडूळ खतनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे शेण महिनाभर कुजवलेले असते. त्यासाठी वेगळा खड्डा तयार केला आहे. आजूबाजूच्या गावांतून गोळा केलेले शेण त्या खड्ड्यात ठेवले जाते. Gandul khat nirmiti prakalp
उन्हाळ्यात पालापाचोळा शेडच्या जवळ जमा करून ठेवला जातो. खत तयार करताना टाकीच्या तळात नारळाच्या सोडणाचा थर देऊन त्यावर पालापाचोळ्याचा थर असतो. त्यावर शेणाचा थर, पुन्हा पालापाचोळा आणि परत शेणाचा थर टाकला जातो.
या ढिगावर पुरेशा प्रमाणात गांडुळे सोडली जातात. साधारणपणे दीड महिन्यात खत तयार होते. आम्ही गांडूळ खताचा दर्जा राखण्यावर भर दिला आहे. खताची प्रयोगशाळेतून तपासणी केली आहे. त्यांचे प्रमाणपत्र आमच्याकडे आहे.
खत उत्पादन आणि विक्रीबाबत रंजना कावणकर म्हणाल्या, की प्रकल्पातून सध्या वर्षाला ४० टन गांडूळ खताची निर्मिती होते.आम्ही १२ रुपये प्रति किलो या दराने खताची विक्री करतो. वर्षाला पावणेचार लाखांची उलाढाल होते.
प्रकल्पामध्ये गटातील दहा महिलांसह अन्य पाच महिलांना वर्षभर रोजगार मिळाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून बचत गटातील सदस्यांना दरमहा दोन हजार रुपये मजुरी मिळते. वर्षभरातील खत विक्रीच्या नफ्यातून दरवर्षी प्रत्येक सदस्याला दहा हजार रुपये मिळतात.
गटाचे नियोजन
दर महिन्याला बचत गटाची बैठक होऊन पुढील महिन्यात करावयाच्या कामाचे नियोजन केले जाते. बचत गटामध्ये दरमहा प्रति सदस्य पन्नास रुपये वर्गणी जमा केली जाते. सध्या गटाची पाऊण लाखांपर्यंत बचत झाली आहे.
मासिक वर्गणी, खेळते भांडवल यामधून अंतर्गत कर्ज व्यवहार, कर्जाचा लाभ, कर्ज व्यवहारातून गटातील सदस्यांना मागणीनुसार आर्थिक मदत केली जाते. शौचालय बांधकाम, घर दुरुस्तीसाठी देखील या रकमेचा वापर केला जातो.
मदतीची पूर्ण परतफेड होते की नाही याचा हिशेब ठेवला जातो. गांडूळ खत प्रकल्पासाठी बँकेकडून मिळालेले पाच लाखांचे कर्ज फेडून आज बचत गट स्वतःच्या आर्थिक गुंतवणुकीवर खंबीरपणे उभा आहे, असे गटाच्या अध्यक्षा सुजाता कावणकर यांनी सांगितले. Gandul khat nirmiti prakalp
बचत गटामुळे फायदा
बचत गटाच्या माध्यमातून ग्रामपंचायत, ग्रामसभा, पंचायत समिती, विविध शासकीय कार्यालय, बँक या ठिकाणी वारंवार संपर्क सुरू झाल्याने महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला. वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती मिळाली.
बचत गटाच्या माध्यमातून सहलीचे नियोजन केले जाते. स्वच्छता अभियान, निर्मल गाव, चारसूत्री भात लागवड, शेतीशाळा, वनराई बंधारे, वृक्ष लागवड, दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी असलेल्या योजनांचा फायदा झाला.
रोजगार उपलब्धीसोबतच महिलांची एकी, श्रम आणि गांडूळ खतनिर्मिती तसेच शेतीमधील विविध उपक्रमांची दखल घेत शासनाने बचत गटाला कोकण विभाग स्तर, जिल्हा स्तर आणि तालुका स्तरावर राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविले आहे. याचबरोबरीने गटाला २०१९ मध्ये राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.
0 Comments